Tuesday, April 4, 2023

आकलनिय आणि अनाकलनीय

आकलनिय आणि अनाकलनीय गोष्टींच मिश्रण म्हणजे आयुष्य अशी एक व्याख्या आपल्याला करता येणं शक्य आहे.आपल्या अनुभवातुन आणि मेहनतीतून काही कोडी ,काही रहस्य उलगडत रहातात.काहींची उकल कळते पण काहींचा आदि आणि अनंत कळतच नाही.आपण प्रयत्नाने घडवतो एवढाच घटनाक्रम म्हणजे आयुष्य नव्हे. घडणं हा भाग आपल्या जगण्यात अधिक महत्त्वपूर्ण आहे.घडणं आणि घडत रहाणाऱ्या गोष्टींची नोंद आपल्याला ठेवणं तितकंस महत्त्वाचं नाही वाटंत.आपले प्रयत्न आणि त्याला नैसर्गिक शक्ती अथवा ईश्वरीय शक्तीची असलेली जोड याची बेमालूम गुंफण म्हणजे आपलं आयुष्य आहे.मी करतो माझ्याच मुळे होत आहे अशी आपली जर तार लागली असेल तर ही गुंफण लक्षात येणं जरा कठिनच आहे.नैसर्गिक अथवा ईश्वरीय शक्ती आपल्या सोबत आहे हा सहज स्वीकार आपल्या अंतर मनात असायला पाहिजे.आपण आपल्या प्रयत्नाने जे भौतिक साम्राज्य उभं करतो त्याचा दाता /निर्माता केवळ मी नाही असा विचार आपल्या आयुष्याला खरा स्थिरता देणारा विचार आहे.साक्षीभावाने आपल्या जीवनाकडे पहाणं आपल्याला जमायला हवं म्हणजे मग सर्व प्रकारच उताविळपण आणि भांबवलेपण आपोआप लोप पावत जाईल.यासाठी विचार करण्याच्या पद्धतीमधील आपली ताठरता कमी करत रहाणं हा आपल्या हातातील एक शाश्वत उपाय आहे हे आपण लक्षात घेऊयात .

No comments:

Post a Comment